हा फोटो आहे सूर्योदयाचा. उद्देश एकच हा जो ब्लॉग मी लिहितोय तो प्रसाद सु प्रभू या नावाच्या व्यक्तीच्या स्वतंत्रपणे काही करून दाखविण्याच्या उदयाला सुरुवात झाली तेंव्हाचा.म्हणूनच सूर्योदयाचा फोटो घालून सुरुवात करतोय.
बेळगावच्या प्रकाश लॉजिंग मध्ये मॅनेजर म्हणून काम करण्याचा शुभारंभ झाला. किर्लोस्कर रोड वरील हा लॉज म्हणजे गोमंतकीय नागरिकांचे बेळगावातील हक्काचे घर. गोव्याचे लोक खरेदीसाठी दर आठवड्याला बेळगावला यायचे. आत्ताही येतात पण रस्ते सुसाट झाल्यापासून त्यांचे वास्तव्य कमी झाले. पूर्वी ते यायचे. बेळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठेत मनसोक्त विहरायचे. खरेदी करायचे आणि वास्तव्याला एक तर हॉटेल अनुपम किंवा प्रकाश लॉजलाच जास्त पसंत करायचे. यामुळे सतत कोकणी बोलणाऱ्या आणि नेहमी चांगली मच्छि कुठे मिळता रे असे विचारणाऱ्या आवाजांची सवय करून घ्यावी लागली.
इथला दिवस लवकर सुरू व्हायचा. सकाळी सहा वाजता उठावे लागायचे. रूम बॉईज सकाळी सकाळी बम्ब पेटवायचे. कस्टमरला लवकरात लवकर गरम पाणी मिळावे आणि कुणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जायची. लगेचच साफसफाई सुरू व्हायची. लॉजला आलेली माणसे रात्री उशिराच जेवायची. त्यांची ताटे दरवाजाबाहेर सरकावलेली असायची. ती उचलण्यापासून ते रिकाम्या झालेल्या रूमची स्वच्छता सुरू व्हायची.या सगळ्यावर लक्ष ठेवणे आणि योग्य स्वच्छता करून घेणे हे प्रमुख काम होते. इतक्यात नव्याने रुम घेणारे आणि रुम सोडून जाणारे यांची लगबग सुरू व्हायची. लॉज च्या कौंटरवर भले मोठे रजिस्टर आणि पाठीमागे कप्प्या कप्प्यांचे चाव्या ठेवण्याचे कपाट होते. येथे ग्राहकांच्या अनेक तऱ्हा पाहायला मिळायच्या. तीस वर्षांपासून येतो आम्ही इथे आल्याशिवाय बेळगावाक आल्यासारखे वाटतच नाय असे सांगत गोवेकर बोलायला सुरुवात करायचे. आणि मग हळूच काल डास फार चावले हो आमका, किंवा चादरीक कसलोतरी विचित्र वास येतो अशी काहीतरी कारणे सांगून जायचे. इतर भागातून येणारे बरेच असायचे त्यांचा कामाशी मतलब असायचा. रात्री जरा जास्त झाली की कुठे रूम बेल मार, दरवाजे आपट आणि आरडाओरड कर असे प्रकार चुकून कधीतरी व्हायचेच. विशेष म्हणजे संयम काय हे शिकायचे असेल तर प्रत्येकाने जीवनातला एक महिना तरी लॉज मध्ये काम केले पाहिजे. ग्राहक ते, त्यांच्यावर रागवायचे तर नाहीच पण त्यांचे समाधान होईल असे उत्तर द्यायचे हे कसब होते. ते याठिकाणी शिकायला मिळाले.
1974 च्या काळात ज्येष्ठ धुरीण कै. जे डी पाटील यांनी या लॉज ची सुरुवात केल्याचे मी ऐकले आहे. बाजूलाच फेमस प्रकाश बोर्डिंग ही त्यांनीच उभारले. लॉजिंग चे काम तेंव्हा माझे भाऊ अवधूत नार्वेकर आणि काका निळूभाऊ नार्वेकर बघायचे. त्यांची शिस्त चांगली होती. पोरगं पहिलाच घरातून बाहेर पडलंय, कुणाच्यातरी नादाला लागेल जरा लक्ष ठेवा अशी सगळ्यांना सूचना होती. नात्यातला म्हणून काम कमी वगैरे काय भानगड नव्हती. जेवण प्रकाश बोर्डिंग मध्ये मिळायचे.सकाळी चपाती आणि भाजी किंवा आमटी,दुपारी भात आणि आमटी व रात्री कधी नुसता भात तर कधी चपाती असा मेनू असायचा.स्टाफची भाजी आणि आमटी खाताना जरा वाईट वाटायचे कारण यापूर्वी कधीच घरातून बाहेर न गेलेला मी असा अचानक पहिल्यांदाच बाहेर आलो होतो. घरच्या जेवणाची आठवण यायची.पण घराबाहेर पडल्यावर हे आवडतं, ते आवडत नाही ही नाटकं करून चालत नाही याचं ट्रेनिंग सुरू झालं होतं.
लॉजिंग मध्ये पहिल्या की दुसऱ्या दिवशी एक मजा झाली. जेवायला गेलेलो असताना आमच्या स्टाफ चे जेवण असलेल्या टेबलावर कुणीतरी तळलेले मासे ठेवले होते. तळून नेत असताना चुकून ती प्लेट राहिली असावी. मला ते माहीत नव्हते. मी पहिलाच मांसाहाराचा भोक्ता असल्याने पटकन त्यातला एक मासा उचलला. आजूबाजूच्यांनाही ते लक्षात आले नाही, नाहीतर त्यांनी सांगितलं असतं. मी जेवू लागलो. इतक्यात वेटर येऊन ती प्लेट घेऊन गेला. पाच मिनिटात कुकच्या नावाने ओरडत परत आला. अरे सहा माशे फ्राय ची ऑर्डर दिली आणि पाच दिलास की रे, गिर्हाईक बोंब मारतंय असे म्हणत तो ओरडू लागला. कुकनेही मासे तळायचा मोठा झाराच उचलला आणि दारू पिऊन काम करतोस काय रे म्हणून त्या वेटरवर डाफरु लागला. अरे मी सहा मासे फ्राय केलोय. जाताना कुठे टाकून गेलास काय बघ गडबडीत, त्याने आपली बाजू सावरून घेतली. आता शोधाशोध सुरू झाली. मी गडबडलोच, कारण मी तोपर्यंत अर्धा मासा फस्त केला होता. बाकीचा मासा आणि काटे मी थेट भाताच्या ढिगाखाली ढकलले आणि वर बघत राह्यलो. मॅनेजर , ओ सावकाराचे पावणे ,मासा कोण घेतला बघितला का? मी सरळ नाही म्हटले. काहीवेळ शोधाशोध चालली. एकमेकांवर आरडाओरड झाली आणि मग परत एक मासा तळायला कढईत सोडण्यात आला.
माझी तारांबळ उडाली होती. आता मी घेतला म्हणायचे तर अब्रू जाणार आणि लपवून खायचा म्हणजे लक्षात येणार. मी हळू हळू आजू बाजूचा भात खात चोरट्या नजरेने इकडे तिकडे बघत राहिलो. काय जमेना आणि आतून लाज पण वाटू लागली होती. इतक्यात बाजूला जेवणाऱ्या एकाने सांगितले, हे साले आपली सोय करण्यासाठी मासे कुठेतरी लपवतात आणि मग दुसऱ्याच्या नावाने बोंबाबोंब करतात. आता दोघांचाही पगार कापतील. मला आणखी वाईट वाटले, त्या बिचाऱ्यांचा काहीच संबंध नव्हता, मीच चोर होतो आणि पगार त्यांचा कापला जाणार होता. आता खरे बोलायचे तर एक व्याप, गप्प बसायचे तर मनाची घालमेल, त्या तळलेल्या माश्याने बरोबर बदला घेतला होता. कसंबसं जेऊन आणि भातात लपवलेल्या त्या माशाला खरकटी टाकण्याच्या बुट्टीत विसर्जित करून मी हात धुवून निघालो. मी कुणाला काहीच सांगितले नाही पण संध्याकाळ पर्यंत मीच मासा खाल्ला ही बातमी फुटली होती. बरेचजण काहीच न बोलता वेगळ्या नजरेने माझ्याकडे बघत होते. शरमेने जीव जाण्याची वेळ आली होती. आता काय करायचे समजत नव्हते. आमची मावशी किंवा काकांना समजलं असेल काय? ते ओरडतील की काय? असे अनेक प्रश्न घेऊन मी त्या दिवशी नजरा चुकवत होतो. रात्रीचे साडेनऊ वाजले तसे आता परत जेवायला कसे जायचे हा प्रश्न पडला होता. पण मला एक निरोप आला अवधूत सावकारांनी वर 105 मध्ये बोलावलंय. मी गेलो. दादाने बस अशी खूण केली. काय मासा खाल्लास? एवढंच बोलून तो हसला आणि म्हणाला राहूदे रे होतंय असं कधी कधी. मी शरमेने खाली बघू लागलो. तू घरचा माणूस रे असं लाजायचं नाही असं तो म्हणाला. हे बघ समोरच्या आदिनारायण मधनं दोन फिश थाली सांगितलोय. पोटभर खा आणि परत बोर्डिंग मध्ये जेवताना जरा काळजी घे. मला हायसे वाटले. ती थाळी आल्यावर जेवताना नकळत डोळ्यातून थेंब पडत होते. आपण केलेली चूक,झालेली चर्चा आणि बंधुप्रेमातून मिळालेले पोटभर मासे या सगळ्या गोष्टींचा संगम झाला होता.
प्रकाश लॉजिंग मध्ये आणि बोर्डिंग मध्ये आमच्या चंदगड तालुक्यातली आणि कोकणातली अनेक मुलं कामाला यायची. त्यांची ओळख होऊ लागली आणि दिवस जाऊ लागले. बरेचसे मिलिटरी भरतीसाठी यायचे. बेळगावला एम एल आय आर सी चे केंद्र. येथे पुढील सहा महिन्यात भरती असली की ही फोज पहिल्यांदा प्रकाश मध्ये यायची. पहाटे चार ला उठून मनसोक्त पळायचे, दिवसभर काम करत करत पोटभर भात खायचा आणि पगारही मिळायचा. जास्तीतजास्त दहावी पास असायचे. भरती पूर्वी बेळगावात राहायचे,खायचे आणि पगाराचे हक्काचे ठिकाण म्हणजे प्रकाश अशी ओळख बनली होती.
एक दोन आठवड्यात मी त्या किर्लोस्कर रोड च्या वातावरणात मिक्स झालो. किर्लोस्कर रोड म्हणजे बेळगावचे वैभव. प्रत्येक शहरात असा एक मार्ग प्रसिद्ध असतो आणि लखलखत राहतो. तसेच वैभव या रोड वर पाहायला मिळायचे. दिवसभर तर गर्दी असायचीच पण रात्री हे वैभव अधिक वाढायचे. सायंकाळ नंतर लागले जाणारे दिवे आणि प्रत्येक दुकानातून दरवळणारा सुगंध मन मोहवून टाकायचा. रस्त्याने ये जा करणाऱ्या माणसांना बघत बसावे असे वाटायचे. वेगवेगळे कपडे परिधान केलेली माणसे या रोडचे वैभव आणखी वाढवायची. सर्व गजबज शांत व्हायला रात्रीचे किमान बारा वाजायचे आणि सकाळी पुन्हा सात आठ पासून लगबग सुरू व्हायची.
बेळगावात नाटके यायची तेंव्हा अनेक कलाकार,दिगदर्शक आणि अभिनेते प्रकाश मध्येच उतरायचे. तो मी नव्हेच च्या ज्येष्ठ नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांचे हे लाडके ठिकाण. अनेक खेळाडू, ऑर्केस्ट्रा वाले आणि अनेकानेक मंडळींनी या लॉजचा आसरा घेतला. अशा ठिकाणी प्रत्येक रूम मध्ये राहण्याची संधी मला मिळाली आहे. पण मॅनेजर असताना नव्हे पुढील काळात म्हणजेच तरुण भारत ला लागल्यावर. असो ते पुढे येईलच.
आणि महत्वाचे म्हणजे या लॉजने आपली प्रतिष्ठा मात्र शेवटपर्यंत जपून ठेवली. वाईट धंदे आणि लफडी करणाऱ्यांना प्रकाश ने पैसे मिळतात म्हणून कधीच आसरा दिला नाही. यामुळे या लॉजचा आणि पोलिसांचा संबंध जास्त येत नव्हता. प्रकाश लॉज मध्ये असलं तसलं काही होत नाही, हे स्वतः पोलीस सांगायचे. कधीतरी नाईट ड्युटी करून थकले तर सन्मानाने पाठ टेकवायला यायचे. दुसऱ्या अनेक लॉज मध्ये आठवड्यातून दोनदा तरी छापामारी व्हायची.लगेचच लॉज मालक किंवा मॅनेजर वर गुन्हा दाखल व्हायचा आणि पेपरला फोटोही छापून यायचा. पण असे कधीच प्रकाश बद्दल घडले नाही. गिऱ्हाईक कोण आहे आणि काय करायला आलंय? हे त्याच्या नजरेवरून ओळखण्याची पारख येथेच मी शिकलो. ये चल इथे रूम नाही असे म्हणून एकाद्याला हाकलण्यात आले की सुरुवातीला मला नेमके काय हे कळायचेच नाही. पण हळू हळू कारणं समजत गेली आणि मी ही ओळखू पाळखु लागलो.
आता पुढील भाग पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार. आणि हो हा ब्लॉग कसा वाटला हे खाली लिहायला विसरू नका ही विनंती.

एकदम मस्त
उत्तर द्याहटवा