मागच्या भागात मी म्हणालो, हो तो काळ मोबाईल फोनचा नक्कीच नव्हता. बीएसएनएल चे तरंग नावाचे ओबडधोबड हँडसेट आले होते. त्यावरून कॉल करणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांनाही खर्च व्हायचा. म्हणजे पैसे कट व्हायचे. ग्रामीण भागात बीएसएनएल चेच लँडलाईन किंवा हे तरंग हा आधार होता. शहरी भागात स्पाईस कंपनीचे हँडसेट आले होते. रिलायन्स चा दुनिया मुठ्ठीमे म्हणणारा जमाना या क्षेत्रात अजून यायचा होता. आमच्या मामांकडे मोबाईल नव्हता आणि आमच्या घरी तर फोन असण्याचा संबंध अजिबात नव्हता. गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या अबुल भैय्या( म्हणजे तुर्केवाडीचे अबुल शेख. ते सध्या मोठे व्यापारी आहेत)यांच्या दुकानातील फोन हाच आमचा आधार. अबुल भैय्या कायम बाहेर आणि भाभी कायम दुकानात. त्यांच्या दुकानातील साहित्य उधारी घेऊन आम्ही जमेल तेंव्हा पैसे द्यायचो. कधी कुणाला फोन करायचा झाला तरी तीही उधारी सामानाच्या उधारी यादीत समाविष्ट व्हायची. रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी हाक मारायला हे भैय्या भाभी कधीच त्रास वाटून घ्यायचे नाहीत.
त्यादिवशीही तसेच झाले. 2004 चा जानेवारी महिना होता आणि तारीख होती 15. अचानक भाभीचा आवाज आला. अरे परसाद जलदी आव, फोन आया तुम्हारा. कॉलेज नव्हते,मी घरीच होतो. लगेच दुकानाकडे पळालो. फोन कुणाचा असेल बरं? विचार सुरूच होता. पलीकडून मामा बोलत होते. त्यांनी त्या तरुण भारत च्या जाहिरातीची माहिती दिली. महत्वाचे म्हणजे ती जाहिरात तरुण भारतच्या बेळगाव आवृत्तीला आहे आणि अर्ज करायची तारिख त्याच दिवशीची म्हणजे 15 जानेवारी आहे. आणखी महत्वाचे म्हणजे त्यादिवशी सायंकाळी 5 पर्यंतच अर्ज करता येणार आहेत. लवकर कायतरी कर आणि बसने बेळगावला येऊन आजच्या आज पाचच्या पूर्वी तरुण भारत कार्यालयात जाऊन अर्ज दे. मी ऐकतानाच हे सगळं कसं शक्य आहे? हा विचार करीत होतो.मामांनी परत एकदा कॉइन टाकल्याचा आवाज आला. होय ऐकलं सगळं. मी म्हणालो. आणि हे बघ पेपर कदाचित बँकेत मिळेल. तिथंच बेळगाव आवृत्ती घेतात. हो हो मी जाऊन येतो असे म्हणत मी दुकानातल्या घड्याळाकडे बघितलं. दुपारचे बारा वाजले होते. ठीक आहे ठेवतो फोन असं म्हणून मी फोन ठेवला, आणि आता काय काय करायचं, कसं कसं करायचं याचं नियोजन करत दुकानाच्या कट्ट्यावर विचारात गुंतून गेलो. तो काळ प्रायव्हसी वगैरेचा नव्हता. जीवाला जीव देण्याचा होता. इतकावेळ माझं फोनवर चाललेलं संभाषण भाभी ऐकत होत्या. त्यानंतर गोंधळात पडलेल्या मला त्यांनी हलवलेच. परसाद क्या हुवा? कोनसे खयालोमी अटक्या? त्यांनी विचारले. मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली आणि पुन्हा विचारात गढून गेलो.
आमची आई म्हणजेच आई आणी मामांची आई घरी होती. माझी आई म्हणजेच मम्मी अंगणवाडी शिक्षिका होती.नुकतीच तिची अंगणवाडी पर्यवेक्षिका पदी बढती झाल्याने ती चंदगडला ऑफिसला गेली होती.पैसे नव्हते शिवाय पेपर मिळवून जाहिरात वाचून त्यानंतर अर्ज तयार करून सायंकाळी पाचच्या आत बेळगावला तरुण भारत कार्यालयात जाऊन अर्ज सादर करायचा हे दिव्य होते. विचार करूनच मला घाम आला. मी भाभी ना थोडक्यात सगळं सांगितलं. त्यांनी चटकन गल्ला उघडला. 100 रुपयांची नोट काढून हातात दिली. नोकरिका सवाल है ना? जादा सोचते बैठनेका नही।चल काम को लग तू। जाकू आ। चल भाग अभी।
मला भलताच धीर आला. घरी येऊन मी आईला माहिती दिली. तिनेही लगेच होकार दिला. लगेच चांगले कपडे घालून बाहेर पडलो. थेट महाराष्ट्र बँकेत गेलो. बँकेत सगळे कर्मचारी बेळगावहून कामाला यायचे,शिवाय आमचा भाग महाराष्ट्रात असला तरी जास्त संबंध महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात अडकलेल्या बेळगावशीच असायचा. त्यामुळे तिथे बेळगावचा तरुण भारत घेतला जायचा. मी हळूच आत गेलो. सगळे कामात बिझी होते.आमच्या गावचेच दत्ता दादा तिथे कामाला होते,आजही आहेत. त्यांना हळूच बाजूला बोलावून मला पेपर पाहिजे आणि किती महत्वाचे आहे याची कल्पना दिली. त्यांनी इतरांना डिस्टर्ब न करता की कळू न देता पेपर माझ्या समोर आणून दिला. मी तो उघडला. ती जाहिरात दिसली. हायसे वाटले. मी पूर्ण पेपर न घेता फक्त हवे तेवढेच पान घेतले. मॅनेजर साहेबांना सांगायला पाहिजे का? मी हळूच विचारले. नको आत्ता कामात आहेत. मी सांगतो नंतर दत्ता दादा म्हणाले. चल तू जा, कामाला लाग. आणि हो बेस्ट ऑफ लक....दत्ता दादांनी शुभेच्छाच देऊन टाकली. परत मोर्चा घरी वळविला.
घरी आलो. पांढरे कागद घेऊन लहानसा एक अर्ज तयार केला. आणि कॉलेजच्या बॅगेत तो अर्ज घातला. जोडीला यापूर्वी भाषण आणि निबंध स्पर्धांमध्ये मिळविलेली बक्षिसे आणि प्रमाणपत्रे घेतली. देवाच्या आणि आईच्या पाया पडून निघालो. आता बस पकडायला एक किलोमीटर चालून तुर्केवाडी फाट्यावर जायचे होते. बस पकडल्यावर किमान पाऊण तासांचा प्रवास करायचा होता. दरम्यान आणखी एक मोठी समस्या लक्षात आली. ज्या तरुण भारत कार्यालयात जाऊन सायंकाळी 5 पूर्वी भेटायचे होते ते कार्यालय नेमके कुठे आहे? हेच आपल्याला माहीत नाही? अरे बापरे कसे काय करायचे? तुर्केवाडी फाट्याकडे चालत चालत मी आता या नव्या विचारात गुंतलो गेलो होतो.
--------------------------------------------------------------------------
English version
उत्सुकता पुढच्या ब्लॉगची
उत्तर द्याहटवा