मागच्या ब्लॉग नंतर थोडा उशीर झाला. का लिहितोय? या प्रश्नाची उत्तरे शोधत लिहीत राहणार असं मी जे सुरुवातीला सांगितलं....त्या प्रश्नांची उत्तरं आता सतरा वर्षांनंतर शोधताना अर्थात भूतकाळात शोधताना वर्तमानकाळातील काही घटना आणि घडामोडीत मी इतका अडकलो होतो की उशीर झालाच.
तर मी जाऊन अर्ज देऊन आलो होतो आणि प्रतीक्षेत होतो. आपल्याला बोलावणं येईल की नाही? आपण त्या विद्यार्थी वार्ताहर पदासाठी लायक ठरेन की नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मनात धाकधूक होती. आपण एखाद्या जबाबदारीत किंवा भूमिकेत शिरलो की काहीही करू शकतो अर्थात करून दाखवू शकतो पण ती जबाबदारी किंवा भूमिका मिळेपर्यंत आपली होणारी तगमग वेगळीच असते. ती शब्दात सांगता येत नाही. विशेषतः माणूस संधी मिळविण्यासाठी धडपडत असताना जी मानसिक स्थिती असते ती त्याच व्यक्तीला जास्त चांगली माहीत असते. आपण जे ठरवतो ते नेहमीच लवकर साध्य होईल असे नसते यामुळे थोडा आत्मविश्वास हवा असतो पण त्याकाळात तोच कमी पडत होता. काहीही करून नोकरीत शिरायचे हेच एकमेव ध्येय होते आणि त्यासाठी सरकारी नोकरी प्रमाणे कुठे शब्द टाकणे किंवा वशिला लावण्यासारखे काही करताही येत नव्हते. तसा एक विचार आला होता तरुण भारत मध्ये काम करणाऱ्या एकाद्या व्यक्तीला भेटून शब्द टाकण्याचा. नजरेसमोर तिघे होते. एक म्हणजे आमच्या गावाचाच एक भाग असलेल्या यशवंतनगरचे संतोष हेरवाडकर. त्यांची आणि माझी ओळख होती. ते तरुण भारतच्या वितरण विभागात कामाला होते. दुसरे त्याच गावचे संदीप सबनीस तेंव्हा ते कुठल्या विभागात हे माहीत नव्हते पण आता ते वितरण विभागात आहेत. या माणसांचा उल्लेख सुरुवातीला केला पण तिसरे नाव मी जे घेणार आहे ते वय,अनुभव आणि पदाने नक्कीच मोठे होते ते म्हणजे अनेक वर्षे शिक्षण क्षेत्र आणि पत्रकारिता गाजविलेले आणि निवृत्तीनंतर तरुण भारत मध्ये संपादकीय विभागात रुजू झालेले जयंत सबनीस सर. सबनीस सर आमच्याच गावचे अर्थात सबनीस . पण ते गडहिंग्लजला होते पूर्वी आणि नुकतेच काही वर्षांपूर्वी पुन्हा तुर्केवाडीला परतले होते. लांबून बोलणं बघणं व्हायचं पण त्यांच्याशी जास्त संपर्क कधी आला नव्हता. ताडमाड उंची आणि करारी चेहरा यामुळे त्यांच्याकडे जाऊन बोलायची भीतीच वाटायची. दुर्दैवाने ते फार लवकर गेले. एक आदरयुक्त भीती होती त्यांच्याबद्दल.आज त्यांचा पुतण्या अक्षय सबनीस सकाळ मध्ये कार्यरत आहे. त्यांचा पत्रकारितेचा वसा त्याने पुढे सुरू ठेवला आहे.
तर सांगायचा मुद्दा हा की मी अर्ज केलाय आणि जरा बघा असा शब्द या तिघांपैकी एकाकडे किंवा तिघांकडेही टाकावा का?याबद्दल विचार सुरू केला होता. पण तो विषय घरात चर्चेत असतानाच नोकरीची आणखी एक वाट चालून आली. मागच्या ब्लॉग मध्ये मी सांगितल्याप्रमाणे मी डिप्लोमा मध्ये नापास झालो होतो. रिपीटर म्हणून परीक्षा द्यायची होती. आणि तो अभ्यास करण्यापलीकडे माझ्याकडे दुसरे काहीच काम असे नव्हते. गिल्टीनेस म्हणजेच एक लाजिरवाणेपणा आला होता. त्यामुळेच नोकरीत अडकून चार पैसे तरी कमवावे असा माझा प्रयत्न सुरू झाला होता.इतक्यात आमच्या मावशी घरी आल्या होत्या. बेळगावच्या किर्लोस्कर रोडवर त्यांचे लॉजिंग होते. फेमस प्रकाश लॉज. त्यांचा मॅनेजर नुकताच सोडून गेला होता आणि त्यांना गरज होती विश्वासू मॅनेजर ची. मावशींनी सांगितलं की अभ्यास करायला मिळेल. शिफ्ट प्रमाणे काम करायचं आणि कामपण काय तितकं अवघड नाही. मग मी या तरुण भारत च्या अर्जाची माहिती दिली. तेंव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून विचार केला की जोपर्यंत तरुण भारत कडून काही कळत नाही तोवर आपण हा मार्ग स्वीकारावा. आणि मी दुसऱ्याच दिवशी बेळगावला येऊन लॉज मॅनेजर पदाची सूत्रे स्वीकारली. तरुण भारत मधून कॉल येईपर्यंत या अटीवर.
English version

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा