मुख्य सामग्रीवर वगळा

मीच काम सोडलं


मागच्या ब्लॉग मध्ये माझा प्रवास बेळगावच्या प्रसिद्ध प्रकाश लॉज च्या मॅनेजर पर्यंत झाला होता. मी लॉज मॅनेजर म्हणून कसं काम केलं आणि पुढे तरुण भारत पर्यंत कसा पोहोचलो हा सारा प्रवास पुढील ब्लॉग पासून सांगणार आहेच. मध्ये बराच वेळ गेला आणि ब्लॉग लिहायचं राहून गेलं. आणि मधला सर्व इतिहास पेंडिंग ठेऊन वर्तमानकालीन घडामोड सांगण्याची वेळ आली. माझ्या कारकिर्दीत सध्या आलेला एक टर्निंग पॉईंट आधी सांगून मग मागील प्रवासकडे वळण्याचा निर्णय मी घेतला आहे. आपण वेळ काढून वाचाल हीच अपेक्षा आहे.

नमस्कार,

मी प्रसाद सु. प्रभू. 2004 पासून तरुण भारत या दैनिकात कार्यरत होतो. विद्यार्थी वार्ताहर, वार्ताहर ते विविध भूमिका निभावत निभावत सध्या सोशल मीडिया टीम प्रमुख आणि यु ट्यूब चॅनेल चा डिजिटल एडिटर.

होय होतो, आता नाही. मी माझ्या पदाचा आणि सेवेचा राजीनामा दिला आणि त्याला आज एक महिना पूर्ण झाला. नोटीस पिरियड संपला आणि आता मी मुक्तपणे पत्रकारिता तसेच इतर अनेक भूमिकांमधून तुमच्या सगळ्यांच्याच भेटीला येत राहणार आहे.

राजीनामा दिला तर का दिला? खरंच सोडलं की काढलं? असे अनेक प्रश्न विचारणारे फोन आले म्हणून सांगतोय, माझी संस्था मी स्वतःच सोडली.

सलग 17 वर्षे एकाच ठिकाणी काम, त्यातून एक साचलंपण आलं होतं. जास्त तुंबून राहिलं की शुद्ध पाणीही पुढे दुर्गंधीकडे वळतं आणि त्याला लोक डबकं म्हणतात. असं काही होऊ नये म्हणून बाहेर पडलोय आणि स्वतः बरोबरच इतरांनाही सक्षम करण्याचं एक ध्येय निवडलं आहे. तरुण भारत ही माझी मातृसंस्था. माझी ओळख याच संस्थेमुळे निर्माण झाली. यामुळे तरुण भारत, मालकवर्ग,तेथील सर्व सहकारी यांच्याप्रति नेहमीच कृतज्ञ राहणार आहे.

जे काही करेन त्यात नक्कीच यश मिळेल कारण तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा, सदिच्छा आणि आशीर्वाद पाठीशी आहेतच.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न उद्यापासून करतोय. आपली साथ हवी आहे.

माझा नवा फोन क्रमांक: 8073324496 कृपया नोंद करून ठेवावा.

जय शिवराय.

आता रोज एक ब्लॉग या पद्धतीने माझं तरुण भारत मधील वास्तव्य,तेथील गमती जमती आणि बरंच काही मी तुमच्या सोबत share करीत राहणार आहे. कृपया आवडलं तर प्रतिक्रिया द्या, कॉमेंट करा आणि इतरांनाही पाठवा. नाही आवडलं तर न वाचण्याचं स्वातंत्र्य तुमच्याकडे आहेच.

धन्यवाद.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शोधायला पण लागते अक्कल

 मी काही प्रसिद्ध लेखक नाही. मात्र तरुण भारत च्या कृपेने नक्कीच प्रसिद्ध बातमीदार आहे. एक शैली विकसित करण्यासाठी अनेक वर्षे जावी लागली. पण जी शैली लेखनाच्या बाबतीत आली त्या शैलीचे अर्थात माझ्या लेखनाचे कौतुकही झाले. कामाच्या बाबतीत अनेक ज्येष्ठ व्यक्तींकडून हा अनुभव आला आहेच. आता ब्लॉगचे लिखाण सुरू झाल्यावर तर याचा अनुभव अधिक प्रमाणात येतोय. माझ्या सख्या सहकाऱ्यांनी कौतुक केले, एक वेबसिरीजचा निर्माता फोन करून स्तुती करून राहिला आणि इतर सर्वांनी तर अरे बाबा लवकर लवकर लिही असे सांगून ऊर्जा वाढविली.  केवळ दोन तीन ब्लॉग लिखाणातच मिळालेली दाद ऐकून नेहमीप्रमाणे माझी छाती रुंदावली आहे. मी माझ्या एक खास वाचकाशी काल बोलत होतो. त्या वाचकाने माझ्या मागच्या ब्लॉग वरून म्हटले की प्रसाद अरे तू अजून तुर्केवाडी फाट्यापर्यंत पोहोचला नाहीस. मी म्हटलं जिथे मी सतरा वर्षे नोकरी केली ते तरुण भारत चं कार्यालय मला माहित नव्हतं, मी चालत होतो आणि विचारात होतो.वाचकाने सांगितलं आता पुढचं लिही आणि तो वाचक खास असल्याने म्हणालो अशी उत्सुकता ताणवायला मला आवडतं. मग आम्ही आमच्या व्हाट्सअप्प चॅट वर इमोजी वापरून...

धाकधूक वाढत गेली

 बातम्या वाचणे हा प्रकार माहीत होता पण सलग असे रोज पेपर वाचणे लहानपणी कधी जमले नाही. घरी पेपर घेणं परवडत नव्हतं आणि रविवारी घेतलेला तरुण भारत मुख्य पेपर वाचण्यापेक्षा अक्षरयात्रा पुरवणी वाचण्याबद्दल फार भर होता. सुंदर सुंदर कव्हर स्टोरी आणि आणि ललित लेख वाचायला फार आवडायचे. त्यावेळी अक्षरयात्रेत काही कादंबरी क्र म श स्वरूपात यायच्या,त्या वाचायला मजा यायची. अभ्यासाच्या गोंधळात विशेष वाचन व्हायचं नाही आणि जे काही वेगळं वाचन व्हायचं ते या पुरवणीमुळे त्यामुळे प्रतीक्षा लागून राहिलेली असायची. तसाच बुधवारचा खजाना आणि शुक्रवारी फिल्मी दुनियेवर आधारित पुरवणी हाती पडली की मनसोक्त वाचायची सवय जडली होती. यामुळे बातमी वाचण्याकडचा कल कमी होता. आठवी नववीत गेल्यावर आमच्या जनता विद्यालय हायस्कुलचे मुख्याध्यापक एस एम पाटील सरांनी वर्तमानपत्रात येणारे अग्रलेख वाचण्याचा सल्ला दिला होता. आसपास काय घडतं यावर केलेलं विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेखन असतं ते, त्यामुळे वाचा अशी सूचना त्यांनी एकदा वर्गात केली होती. त्यामुळे कधी कधी आणि शक्यतो कमीच अग्रलेख वाचले गेले होते. हे सांगायचा मुद्दा हा की मी बसमध्ये बसू...

अरे परसाद फोन आया है..............

 मागच्या भागात मी म्हणालो, हो तो काळ मोबाईल फोनचा नक्कीच नव्हता. बीएसएनएल चे तरंग नावाचे ओबडधोबड हँडसेट आले होते. त्यावरून कॉल करणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांनाही खर्च व्हायचा. म्हणजे पैसे कट व्हायचे. ग्रामीण भागात बीएसएनएल चेच लँडलाईन किंवा हे तरंग हा आधार होता. शहरी भागात स्पाईस कंपनीचे हँडसेट आले होते. रिलायन्स चा दुनिया मुठ्ठीमे म्हणणारा जमाना या क्षेत्रात अजून यायचा होता. आमच्या मामांकडे मोबाईल नव्हता आणि आमच्या घरी तर फोन असण्याचा संबंध अजिबात नव्हता. गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या अबुल भैय्या( म्हणजे तुर्केवाडीचे अबुल शेख. ते सध्या मोठे व्यापारी आहेत)यांच्या दुकानातील फोन हाच आमचा आधार. अबुल भैय्या कायम बाहेर आणि भाभी कायम दुकानात. त्यांच्या दुकानातील साहित्य उधारी घेऊन आम्ही जमेल तेंव्हा पैसे द्यायचो. कधी कुणाला फोन करायचा झाला तरी तीही उधारी सामानाच्या उधारी यादीत समाविष्ट व्हायची. रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी हाक मारायला हे भैय्या भाभी कधीच त्रास वाटून घ्यायचे नाहीत. त्यादिवशीही तसेच झाले. 2004 चा जानेवारी महिना होता आणि तारीख होती 15. अचानक भाभीचा आवाज आला. अरे परसाद ...